Mazya Kavita

Name: vinayak

Monday, November 21, 2005

भर दुपारी...

भर दुपारी निघून गेलीस
तेव्हा तुझ्या अंगावरचं
नितळ मुलायम झुळझुळीत पिवळं वस्त्र
झगझगीत उन्हाबरोबर फडफडत राहिलं
कितीतरी वेळ...
तुझ्या प्राजक्तविभोर आठवणी
संध्याकाळच्या कातर क्षणांना
सांगू लागलो अंगणात
तेव्हा, आधीचेच कललेले
चाफ्याचे झाड
अजून जरासे कलले
एक दीर्घ नि:श्वास टाकत...
रात्रीच्या भव्य पटावर
तुझे नक्षत्रांकित डोळे
चांदण्यांमधे
सर्वत्र दिसले.
सर्वत्र दिसले
त्यात लपलेले माझे प्रतिबिंबही...

आणि त्यानंतर अता
ही अशी पहाट उगवली आहे सखे -
तुझ्याशिवायची...
दिवसाचा प्रदीर्घ रस्ता तुडवताना,
जर कधी श्रमलोच,
तर तुझ्या अंगावरचं
नितळ मुलायम झुळझुळीत पिवळं वस्त्र
फक्त फडफडत राहू दे माथ्यावरून...बस्स.

जेव्हा मी कुणीच नसतो -

जेव्हा मी कुणीच नसतो -
निराकार सावल्यांप्रमाणे
क्षितीजावरती लोंबत असतो,
अंधाराच्या मागे लपुनी
शिळा हॊउनी आंबत असतो.

बुरशीलाही बुरा यावा अन
गंजालाही चढावा गंज,
किड्यांच्याही डोक्यात घुमावी
भणभणणारी झांज.

अशी गजबज होता मस्तकी
चित्ताला ये जरा शांतपण,
या शांतीच्या माथ्यावरि पण
नश्वरतेचे घण चिरंतन .

जेव्हा मी कुणीच नसतो -
असण्याचा सारे काही
अर्थ अचानक सुटू लागतो,
या नसण्याचा त्या असण्याशी
संबंध भराभर तुटू लागतो...

डोळे

डोळे शहाणे असतात...
अवघडतात शब्द ओठी
अन मनात न सुटणा-या गाठी
पापणी लवून तेव्हा डोळेच प्रतिसाद देतात
डोळे शहाणे असतात...

दूर वर न परतणा-या वाटा
छातीत खोल सलणारा काटा
कुढ्या मनाला करीत मोकळे डोळे बरसतात
डोळे शहाणे असतात...

ती अशी लाडाने जवळ येते तेव्हा...

ती अशी लाडाने जवळ येते तेव्हा
आकाशातली चांदणी हातात आल्याचा भास होतो
किंवा असेही नाही,
कसल्या अनामिक गंधाने भरून राहिलेला श्वास होतो.

ती अशी लटिके रुसू पाहते तेव्हा
आकाशातला चंद्र ढगातहळूच लपून बसतो
किंवा असेही नाही,
माझा मिश्कील शब्दही उगिच जपून असतो.

ती अशी डोळे भरून उदास पाहते तेव्हा
आकाशातली नक्षत्र थोडीहलल्यासारखी वाटतात
किंवा असेही नाही,
मेघांच्या रांगा मनातूनचालल्यासारख्या वाटतात.

ती माझी कविता माझ्याचसमोर वाचते तेव्हा
तिच्या डोळ्यांतून माझीच नव्यानेओळख मला होत असते,
किंवा असेही नाही...
नाते अनामिक दोघांमधले दोघांनाही कळत-नकळत
वळण सुंदरसे घेत असते...!
ती अशी लाडाने जवळ येते तेव्हा...

दु:ख

लहरत गेले झाड धुक्यातून
अन हसले आभाळ जरासे
थेंब दवाचे असे थबकले
अन फसले आभास जरासे..

तळ्याकाठची रानकेतकी
झुके तळ्याशी उगीच जराशी
रुप न्याहाळता डोहामधले
थरथरले थेंब जरासे..

उगीच हसणे रुसणे उगीचच
कारणाविना अन मुसमुसणे
गीत स्वरांचे ओथंबलेल्या
ऐकुनि थांबले पक्षी जरासे..

ती येता मग गर्द सावली
डोहामध्ये अंधार साचला
स्मितांच्या प्रतिबिंबाखालून
एक जन्मले दु:ख जरासे..

खूप दिवस झाले असतील..

खूप दिवस झाले असतील...
लहाणपणी अंगणात मैत्रिणींसोबत खेळतानामधूनच चिडून उठून गेलीस,
आणि लिंबामागे जाउन लपून बसलीस;
पण कुणीच आलं नाही तुझी समजूत काढायला
मग तुझी तुच उठून गेलीस सरपण आणायला...
खूप दिवस झाले असतील...

आठवतं एकदा पाण्याला गेलेली असतानामधेच आमराईत रेंगाळलीस,
कै-यांच्या आंबटओल्या गंधानं मोहरुन गेलीस
पण, कोकिळेच्या कूजनामागून जेव्हा 'माय'ची हाक आली-
दिस ढळायच्या आत परतण्यासाठी तुझी लगबग सुरू झाली...
खूप दिवस झाले असतील...

तव्यावरची भाकरी तव्यावरच करपली होती
कुणास ठाउक कुठे तू अगदी हरपली होती
मग तू भानावर कशी आली ते तुल ठाउकच आहे
मानेवरचा दाह अजून कुठेतरी खोलवर जळतच आहे..
खूप दिवस झाले असतील...

पत्र्यातून झिरपणा-या चांदण्याकडे बघून
'त्या'ला उठवावं असं मनात आलं असेल दाटून
ते मनातलं चांदणं मनातच साठवून ठेवलंस
मन मारुन जगायचं अंगवळणी पाडून घेतलंस...
खूप दिवस झाले असतील...

खरंच खूप दिवस झाले असतील आता...
आपण खूप सोसलं वगैरे ही जाणीवही नसेल आता
पण, तू साठवून ठेवलेलं चांदणं तुझ्या डोळ्यांतून सांडत असतं
अन तुझीच कहाणी तुझ्याही नकळत गदगदून मांडत असतं...